Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावअमळनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाची कडक कारवाई

अमळनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाची कडक कारवाई

पोलीस-पाटील आणि महसूल अधिकाऱ्यांची गस्तमोहीम जोरात

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांची संयुक्त पथकांची नेमणूक केली आहे. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या मोहिमेमुळे अवैध वाळू उपसा नियंत्रणात येत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

अमळनेर तालुक्यातील नदीकाठावरील वाळू उपसा ही समस्या दीर्घकाळ लक्षात असली तरी याकडे प्रशासनाकडून आता विशेष लक्ष देण्यात येत आहे. महसूल अधिकाऱ्यांसह पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या सहकार्याने अनेक पथक तयार करून, नदीकाठा आणि वाळू वाहतुकीच्या मार्गांवर नियमित गस्त घालण्यात येत आहे. या गस्त पथकांमध्ये दररोज फेरबदल केला जात असल्याने अवैध वाहतुकीसाठी कोणालाही पूर्वसूचना किंवा सेटिंग करण्याची संधी मिळत नाही.

पोलीस पाटील गणेश भामरे यांनी सांगितले की, “रात्रीच्या वेळी गटाने एकत्रितपणे गस्त घालून नदीकाठावर अवैध वाळू उपसावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे अवैध वाळू वाहतुकीत लक्षणीय घट झाली आहे.” प्रशासनाने प्रत्येक वाळू चेकपोस्टवर २० ते २५ सदस्यांचे पथक तैनात केले असून, तिथे सतत लक्ष ठेवले जात आहे.

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे म्हणाले, “ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या सहकार्याने अवैध वाळू वाहतुकीवर कडक नियंत्रण आणण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. प्रशासन सज्ज आहे आणि कोणालाही अवैध उपसाची परवानगी देणार नाही.”

तालुक्यातील बिलखेडा, हिंगोणे खुर्द, सखाराम महाराज मंदिर परिसर अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत असून, यापूर्वीच अनेक अवैध वाहने जप्त करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कारवाईमुळे भविष्यात अवैध वाळू उपसा पूर्णतः टाळण्यासाठी प्रशासन सतर्क राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या