अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अमळनेर शहर व परिसरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत मोटारसायकल चोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २४ मोटारसायकलअसे एकूण किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे चोरट्यांच्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता भरकर आणि चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोसो यांच्या मार्गदर्शनाखाली, अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, गणेश पाटील, उत्कम कुमार म्हसके, नितीन ननोरे, चाल पाटील व हितेश बेहरे यांनी काटेकोर तपास करून ही कारवाई यशस्वी केली.
तांत्रिक तपासातून उघड झाले रॅकेट…
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ या मोटारसायकल चोरी प्रकरणांचा तपास सुरु असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासात आरोपी हिर्भत हिल्या पाकट, अंबालाल भुरट्या खरडे (दोघे रा. शहादा, जि. नंदुरबार) यांच्याकडे संशय बळावल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत दोघांनी अमळनेर व परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
जंगलातून २४ मोटारसायकली जप्त…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून सातारा–शहादा परिसरातील जंगलात शोधमोहीम राबवली. त्यात २४ मोटारसायकली जप्त झाल्या. जप्त वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर अशा विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.काही वाहनांवर बनावट क्रमांक प्लेट लावल्याचेही पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. सर्व मोटारसायकली अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.
आरोपींवर गुन्हा दाखल…
दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ काशिनाथ पाटील व पोक ५२२ सागर साळुंखे करीत आहेत.

