अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा व अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनांनुसार अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी यशस्वी कारवाई केली आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा व अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना, अमळनेर परिसरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांबाबत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच विविध ठिकाणचा डम्प डेटा तपासण्यात आला.या तपासादरम्यान अरबाज शेख सानोद मनियार (वय 28, रा. धुळे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात ममुद अरचन शेख साजिद मनियार (वय 28, रा. धुळे) यास अटक करण्यात आली.
आरोपींकडून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, चोरलेल्या मोटारसायकली धुळे शहरात लपविल्याचे सांगितले. त्यानुसार मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या परवानगीने व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार धुळे शहरात जाऊन खालील मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.यात हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस (DRS) काळ्या व ग्रे रंगाची मोटारसायकल, क्र. MH-19 EJ-5439, किंमत अंदाजे ₹30,000, सुझुकी कंपनीची Access 125 काळ्या रंगाची स्कूटी, क्र. MH-18 BY-6692, किंमत अंदाजे ₹50,000, सुझुकी कंपनीची Access 125 निळ्या रंगाची स्कूटी, क्र. MH-39 AN-8269, किंमत अंदाजे ₹50,000 असा एकूण ₹1,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याचा सविस्तर पंचनामा करून अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे.
सदर आरोपींना अमळनेर पोलीसांकडून अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ.चंद्रकांत पाटील व पो.हे.कॉ. मिलींद सोनार हे करीत आहेत.

