Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावअनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात.

अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात.

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अनुभूती बालनिकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतन स्कूलचा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात पार पडला. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्यांच्या मनोहारी कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या देखण्या सादरीकरणांनी उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, फरहाद गिमी, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन, तसेच अनुभूती बालनिकेतन आणि विद्यानिकेतनचे प्राचार्य मनोज परमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचे औचित्य वाढवले. ‘तेरा मंगल मेरा मंगल…’ या गीतावर स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांची भूमिका साकारणाऱ्या निवेदकाचे आगमन विशेष आकर्षण ठरले. कीर्ती पगारिया व स्मिता काटकर यांनी भवरलालजींच्या कार्याचा जीवनदर्शनात्मक आढावा प्रास्ताविकातून मांडला.‘भारत प्यारा’ या देशभक्तीपर समूहगीताला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्कृत वर्णमाला गीत, कृष्ण–राम कथा सादरीकरण आणि ‘रामराज्य’ या नाटिकेद्वारे पौराणिक कथांचा देखणा उलगडा करण्यात आला. चिमुकल्यांनी जीवनातील अध्यात्म, साधेपणा, भक्तीभाव आणि मानवी मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवले.

महाराष्ट्रातील सणांवर आधारित नृत्यसादरीकरणातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक उभी केली. आरोग्य आणि कलेचा संगम साधणाऱ्या योगा, झुम्बा आणि ॲरोबिक्सच्या सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीराचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. उपस्थितांनी या सर्व सादरीकरणांना भरभरून दाद दिली.मनोगत व्यक्त करताना अंबिका जैन म्हणाल्या की, माळी जशी रोपांची निगा राखतो तसेच शिक्षक मुलांना संस्कारित करून सुज्ञ नागरिक घडवतात. मुलांनी सदैव हसतमुख, जिज्ञासू राहावे व प्रश्न विचारत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मनोज परमार यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

‘वंदे मातरम्’च्या गजरात कार्यक्रमाचा समारोप झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या