Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण भक्ती संगीत संध्या

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण भक्ती संगीत संध्या

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठेभाऊ यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांवर ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र ठेवत त्यांना प्रेम व मार्गदर्शन दिले. त्याच आत्मीयतेच्या स्मरणार्थ अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास तसेच अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे आणि निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. ‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करत मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

‘पांडुरंग नामी लागलासी ध्यास…’ या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘देवा इंद्रायणी थांबला…’, ‘तुझ मे राम मुझ मे राम… मुझमे राम तुझमे राम सबमे राम समाये…’, ‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी…’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…’, ‘माझे माहेर पंढरी…’ अशी विविध भक्तीगीते विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केली. प्रत्येक सादरीकरणातून भक्तिभाव, समर्पण आणि संस्कारांची जाण प्रकर्षाने जाणवली.या संगीत संध्येतून केवळ सुरेल गायनच नव्हे, तर मोठेभाऊंच्या जीवनमूल्यांचा जागरही करण्यात आला.देशप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, तसेच मानवतेच्या नात्याने परस्परांविषयी आदर व आपुलकी जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे व्यक्त झाला.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत संवेदनशील समाजनिर्मितीचा संदेश देणारी ही स्वरमयी आदरांजली उपस्थितांच्या मनात कायमची घर करून गेली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या