₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील ; मराठवाडा-खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित व सुलभ
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वाधिक अवघड व धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना गेल्या अनेक वर्षांपासून अपघात, वाहतूक कोंडी व प्रवासातील विलंबाचा सामना करावा लागत होता. आता या घाटातून प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे.
सुमारे ₹२,४३५ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प धुळे जिल्ह्यातील टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात उभारला जाणार आहे. या बोगद्याच्या उभारणीनंतर मराठवाडा आणि खान्देश विभागातील वाहतूक अधिक सुकर होणार असून, संभाजीनगर–पुणे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच अपघाताचे प्रमाण घटून इंधन आणि वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
“औट्रम घाट आता इतिहासजमा होणार” ; खासदार स्मिता वाघ…
“औट्रम घाटात अनेक अपघात झाले, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. घाटाऐवजी सुरक्षित बोगदा उभारावा, ही जनतेची जुनी मागणी होती. या मागणीसाठी आम्ही सातत्याने केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला. अखेर केंद्र सरकारने या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल.” खासदार वाघ यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण झपाट्याने सुरू आहे. या प्रकल्पामुळे इंधन बचत, वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरील ताण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पाठपुरावा करणाऱ्या जनप्रतिनिधींना श्रेय…
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
प्रकल्पाचे तांत्रिक तपशील :
बोगद्याची लांबी : ५.५० किलोमीटर
रस्त्याचा एकूण विस्तार : टेलवाडी ते बोधरे — १५ किलोमीटर
एकूण प्रकल्प खर्च : ₹२,४३५ कोटी
अनुमानित वाहन वेग : ताशी १०० किलोमीटरपर्यंत
रचना : डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन प्रणाली, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग
सुरक्षा सुविधा : अत्याधुनिक फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही नेटवर्क, वाहन नियंत्रण केंद्र
या बोगद्याच्या माध्यमातून औट्रम घाटातील धोकादायक वळणे आणि उंच चढउतारांना कायमचा निरोप मिळणार आहे. त्यामुळे मराठवाडा व खान्देश जोडणारा हा मार्ग देशातील एक अत्याधुनिक आणि सुरक्षित महामार्ग मार्ग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

