कृषी, शाश्वत विकास आणि जागतिक समृद्धीसाठी केलेल्या योगदानाची दखल. मुंबईत ताज पॅलेस येथे दिमाखदार सोहळा; देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती.
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांना जागतिक कृषी, शाश्वत विकास व मानवी कल्याणासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड २०२५-२६’ ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल ताज महाल पॅलेस येथे पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार जगभरातील १० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय उद्योगगटांना जागतिक पातळीवर शांतता, समरसता व सहकार्य वाढवण्याच्या कार्याबद्दल दिला जातो. यावर्षी अशोक जैन यांची निवड शेती, पाणी व्यवस्थापन, अन्न सुरक्षा व शाश्वततेसाठी त्यांच्या पथदर्शी कार्यामुळे करण्यात आली. उल्लेखनीय पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये मातृ अमृतानंदमयी, बाबा कल्याणी, नादिर गोदरेज यांचाही समावेश आहे. अशोक जैन यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांनाही या सोहळ्यात गौरवण्यात आले.
अशोक जैन यांच्यासह गौरवण्यात आलेले मान्यवर..
मातृ अमृतानंदमयी (अमृता विश्वविद्यापीठ), बाबा कल्याणी (भारत फोर्ज), विक्रम श्रॉफ (UPL Group), नादिर गोदरेज (गोदरेज इंडस्ट्रीज), मधुकर पारख (पीडीलाईट), डॉ. हुजेफा खोराखीवाला (व्हॉकार्ड), मनीष झावर (QK टेक्नॉलॉजी), विश्वास जैन (CEG ग्रुप), विशाल चोरडिया (सुहाना मसाले) गतवर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना या मंचावर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी..
समारंभाचे प्रमुख अतिथी पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा होते. पुरस्कार लेफ्टनंट जनरल अरुण अनंथानारायणन, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, रवी अय्यर आणि गगन मल्होत्रा (वीर अवॉर्ड संयोजक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन हेही उपस्थित होते.
परिसंवादातून विवेकानंदांच्या विचारांचे चिंतन..
कार्यक्रमादरम्यान दोन विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या परिसंवादात विविध क्षेत्रातील विचारवंत, उद्योजक व शास्त्रज्ञांनी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा आजच्या सामाजिक-आर्थिक संदर्भात पुनरावलोकन केले. हा पुरस्कार सोहळा दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी आयोजित केला जातो. १८९३ साली शिकागो येथे पार पडलेल्या “World’s Parliament of Religions” मध्ये स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. याच भाषणातून “वसुधैव कुटुंबकम्” या महान विचाराची जागतिक पातळीवर मुहूर्तमेढ रोवली गेली होती.
पथदर्शी कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गौरव..
अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली जैन इरिगेशनने पाण्याच्या स्मार्ट व्यवस्थापन, सूक्ष्मसिंचन प्रणाली, शाश्वत शेती, कृषी-तंत्रज्ञानाच्या प्रसार व शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा कार्यभार केवळ भारतापुरता मर्यादित न राहता, जगभरातील शेतकरी आणि समुदायांपर्यंत पोहोचला आहे.
अशोक जैन यांचे उद्गार :-
> “जैन इरिगेशनचे कार्य हे केवळ तांत्रिक नवकल्पना नाही, तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही उद्योजकतेचा उपयोग बदल घडवण्यासाठी करत आहोत. ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ हे आमचे जीवनध्येय आहे.”