Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यारेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलाचा जीव वाचवित.. शेतकरी मात्र स्वतः मृत्यूमुखी...!

रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलाचा जीव वाचवित.. शेतकरी मात्र स्वतः मृत्यूमुखी…!

जळगाव/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- मंगळवार दि.११ जून रोजी सकाळी १० वाजता जळगाव पासून काही अंतरावर असलेल्या मन्यारखेडा आसोदा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात काल झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून शेतकरी बैलगाडी नेत असताना शेतकऱ्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलगाडी बुडायला लागली बैलगाडी बुडत असताना बैल जीव वाचविण्यासाठी धडपड करू लागले. त्यावेळी मयत शेतकऱ्याने बैलांच्या दोऱ्या सोडून त्यांना मोकळे केले त्यामुळे बैल बाहेर आले. पण शेतकऱ्याचा मात्र बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुकलाल लालचंद माळी (वय ६३) रा. आसोदा ता. जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मयत सुकलाल माळी हे आसोदा गावात त्यांची पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. जळगाव जिल्ह्यात दिनांक ११ मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. मयत सुकलाल माळी हे नेहमीप्रमाणे सकाळी १० सुमारास बैलगाडी घेऊन असोदा मन्यारखेडा रस्त्यावर असलेल्या शेतात जाण्यासाठी निघाले होते. या रस्त्यावर रेल्वेचा बोगदा असून या बोगद्यात पावसामुळे पाणी साचलेले होते. परंतू सुकलाल माळी यांनी रेल्वे बोगद्याच्या पलीकडे जाण्यासाठी बैलगाडी बोगद्या खालून टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली. भेदलेले बैल झटका देवून क्षणात बाहेर आले. परंतू सुकलाल माळी यांना पोहात येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. कुटुंबीयांनी प्रसंगी एकच आक्रोश केला.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या