संकल्पना :- श्रीमती मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- “जिथे मुलींचा आवाज ऐकला जातो, तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते,” या विश्वासातून जन्माला आलेल्या ‘बालिका स्नेही पंचायत’ उपक्रमाने ग्रामीण भागातील मुलींसाठी नव्या आशा निर्माण केल्या आहेत. हा उपक्रम प्रथम नांदेड जिल्ह्यात, त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. उद्दिष्ट स्पष्ट होते – मुलींच्या समस्या थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे.
जळगाव जिल्ह्यात या उपक्रमाला नवे बळ मिळाले आहे. कानळदा गावातील मुलींनी ग्रामपंचायतीच्या सभेत आत्मविश्वासाने मांडले – शाळेतील अडचणी, गावातील स्वच्छतेचा अभाव, अनधिकृत व्यवसाय, महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहांची कमतरता तसेच बालविवाहासंबंधी चिंता. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत अनेक तातडीच्या समस्या मार्गी लावल्या. गावात बदलाचे वारे सुरू झाले असून हा सकारात्मक अनुभव केवळ कानळदापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात पसरत आहे.
‘बालिका स्नेही पंचायत’ ही फक्त एक योजना नसून मुलींच्या आत्मविश्वासाचे, हक्कजाणिवांचे आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या सक्रीय सहभागाचे प्रतीक ठरत आहे.