Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeजळगावसिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजना प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर...

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजना प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू..!

जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात सध्या आठ मोठे प्रकल्प आहेत. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती आली आहे. नशिराबाद पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर या धरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.

या प्रकल्पाचा फायदा जळगाव व जामनेर तालुक्याला होणार आहे.जवळच झिरी व अंजनी नद्या देखील आहेत. वाघूर धरणाला लागूनच हा प्रकल्प असून गेल्या दोन दशकापासून हा प्रकल्प निधीअभावी रखडलेल्या अवस्थेत होता.त्यावेळी या प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा 438.60 लाख होता ,आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 6,000 कोटी रुपयांपर्यन्त गेला आहे.भागपूर हे गाव उमाळा शिवार,कंडारी, बेळी, निमगाव, बेलव्हाळ व नशिराबाद शिवाराला लागून आहे. नशिराबाद व कुसुंबा या दोन्ही गावांना राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे परिसरात भागपूर लगत एमआयडीसी होत आहे.या परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी 70 ते 80 फुटावर असल्याची माहिती मिळाली आहे. भागपूर उपसा सिंचन योजना प्रकल्प साधारणपणे दोन ते अडीच वर्षात पूर्ण होणार आहे.

भागपुर प्रकल्पग्रस्त गाव 👇

प्रकल्पाला वाढीव दर मिळाला तसा शेतीसाठीही दर वाढून मिळावा; शेतकऱ्यांची मागणी

भागपूर हे गाव प्रकल्पग्रस्त म्हणून बाधित झाले आहे. जवळच एमआयडीसी होत आहे, त्यामुळे आधीच्या दरापेक्षा आताचे जमिनीचे दर हे चार ते पाच पटीने वाढले आहे. जवळूनच महामार्गही जाणार आहे.शेत जमिनीचे भाव खूपच वाढले आहे. नियोजित धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांना वाढीव पैसे मिळावेत,अशी मागणी जोर धरीत आहे. जेणेकरून त्या गरीब शेतकरी व भागपूर परिसरातील गरीब ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल आणि ते आपले आयुष्य फुलवू शकतील. जलसंपदा विभाग आणि पालकमंत्री यांनी या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी पुढे आली आहे.

भागपूर गावाचे पुनर्वसन लवकरच

भागपूर गावात सध्या 84 नोंदणीकृत घरे तसेच 49 अतिक्रमीत झोपड्या आहेत. लोकसंख्या 372 इतकी आहे. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी अंदाजे 12 हेक्टर जागा अपेक्षित असल्याचे भूसंपादन विभागाने सांगितले. गावाच्या पुनर्वसनासाठी कुसुंबा शिवारातील जागा राखीव केलेली आहे.तसेच पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या भागपुर उपसा सिंचन प्रकल्पामुळे १८,१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.परिसरात पाणलोट क्षेत्रात वाढ होणार असल्याने हा परिसर ‘ सुजलाम सुफलाम ‘ होईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि लाभ क्षेत्र व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या