जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- Sou Moto Writ Petition No. 5/2025 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांबाबत दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यवाहीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.
या बैठकीत सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य संरक्षण व कायदेशीर अनुपालनाच्या दृष्टीने सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. भटक्या श्वानांमुळे होणारे अपघात व रेबीजसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता जिल्हाभर एकसमान व शिस्तबद्ध कार्यवाही राबविण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत सर्व शासकीय व खासगी शैक्षणिक संस्था, रुग्णालये, सार्वजनिक क्रीडा संकुले, बस थांबे व रेल्वे स्थानके यांची ओळख करून सविस्तर यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित संस्थांच्या प्रमुखांनी मोकाट श्वानांचा प्रवेश रोखण्यासाठी पुरेसे कुंपण, सीमा भिंती व प्रवेशद्वारे उभारावीत, असेही सूचित करण्यात आले. प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका यांनी स्वतंत्र Animal Birth Control (ABC) Center स्थापन करून Animal Welfare Board of India कडून Project Recognition Certificate मिळविण्यासाठी तातडीने अर्ज करावेत, तसेच निर्बिजीकरण शस्त्रक्रिया त्वरित सुरू करून सहा महिन्यांत कार्यक्षेत्रातील सर्व श्वानांचे निर्बिजीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
निर्बिजीकरणानंतर श्वानांना त्यांच्या मूळ ठिकाणी न सोडता AWBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार Animal Shelter मध्ये ठेवण्याचेही आदेश देण्यात आले. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी Anti Rabies लस व Immunoglobulin यांचा पुरेसा साठा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी Animal Birth Control Unit व Animal Shelter उभारण्यासाठी तातडीने योग्य जागेची निवड करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. या बैठकीस अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), सहायक आयुक्त नगरविकास शाखा, जळगाव शहर महानगरपालिका प्रतिनिधी तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी दूरचित्रवाणीद्वारे उपस्थित होते.

