भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहर पोलिसांनी अतिशय धाडसी आणि तांत्रिक तपास करून तब्बल १६ मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या मुसक्या आवळून तब्बल ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार आहे.
प्रकरणाची सुरुवात
१६ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता फिर्यादी अजहरुद्दीन नियाजुद्दीन शेख (३८, व्यवसाय- किराणा दुकान, रा. गोसिया नगर, भुसावळ) यांची हिरो कंपनीची लाल-काळ्या रंगाची HF डिलक्स (क्र. MH-19 BV-5886) ही मोटारसायकल भुसावळ रेल्वे स्टेशनजवळील हिताची एटीएम समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींचा शोध
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासात आरोपीचे नाव काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (वय २०, रा. गारग्या, ता. झिरण्या, जि. खरगोन, म.प्र., सध्या रा. शाहपुर, जि. बन्हाणपुर, म.प्र.) असे निष्पन्न झाले. शाहपुर (जि. बन्हाणपुर) येथून आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार राहुल रितेश चव्हाण (वय १८, रा. जयभीम मोहल्ला, शाहपुर, जि. बन्हाणपुर, म.प्र.) हा असून, दोघांनी मिळून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
मोठ्या चोरीचा कबुली जबाब
चौकशीत आरोपींनी केवळ एका नव्हे, तर तब्बल १६ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये विविध कंपनीच्या मोटारसायकलींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ८,३२,००० रुपये इतकी आहे. पोलिसांनी वेळोवेळी कस्टडी रिमांड घेऊन तपास चालवला आणि सर्व मोटारसायकली हस्तगत करून पंचनामे करण्यात आले.
जप्त मोटारसायकलींची माहिती
हिरो कंपनीच्या HF डिलक्स – ५, स्प्लेंडर – ४, पल्सर – २, शाईन, सीटी १००, प्लॅटीना व इतर – ५ (एकूण १६ मोटारसायकली, किंमत ८.३२ लाख रुपये)
वरिष्ठांचे मार्गदर्शन व कारवाईतील पोलिसांचे योगदान
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावीत तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत पोहेकॉ. विजय नेरकर, पोना. सोपान पाटील, पोकॉ. योगेश माळी, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, पोहेकॉ. किरण धनगर, रवींद्र भावसार, सचिन चौधरी, जावेद शहा, हर्षल महाजन व योगेश महाजन यांचा समावेश होता.