पहिल्याच दिवशी महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत ९ जणांवर दामिनी पथकाची कारवाई
भुसावळ | जीवन वारके | पोलीस दक्षात लाईव्ह :- शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर परिसरात होणाऱ्या टवाळखोरीच्या घटना रोखण्यासाठी भुसावळ शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत दामिनी पथकाने ९ टवाळखोर युवकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई केली.
संबंधित युवक हे १८ ते २० वयोगटातील असून शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींना अश्लील टोमणे मारणे, छेडछाड करणे, गॉगल लावून हिरोगिरी करणे, अशा प्रकारांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले. दामिनी पथक व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत या युवकांना ताब्यात घेतले.कारवाईपूर्वी साध्या वेशातील महिला पोलिसांनी एक तास लक्ष ठेवून कारवाई केली. पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर संबंधित युवकांच्या पालकांना बोलावून त्यांच्यासमोर समज देण्यात आली.
या पथकात पोलिस उपनिरीक्षक भारती काळे, हवालदार विजय नेरकर, महिला हवालदार सीमा आहिरे, भूषण चौधरी, परेश बिऱ्हाडे, प्रशांत सोनार व योगेश महाजन यांचा समावेश होता.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली, तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू असून टवाळखोरी, छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे.
पोलिस विभागाने नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले असून, ही मोहिम सातत्याने राबवली जाणार असल्याचेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.