Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात कोबींग ऑपरेशन ; सोन्याच्या लगडी, गावठी पिस्तूल व १६ दुचाकी जप्त

भुसावळात कोबींग ऑपरेशन ; सोन्याच्या लगडी, गावठी पिस्तूल व १६ दुचाकी जप्त

मध्यप्रदेशसह अनेक जिल्ह्यांत गुन्हे ; पोलीसांवर हल्ल्याचा गंभीर प्रकार उघड

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मध्यप्रदेशातील बडोद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वॉरंट बजावणीसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.45 वाजता घडला. आरोपी करारअली हुजूरअली हा मुरलीग कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असता, जमावबंदी आदेशांचे उल्लंघन करत महिला व पुरुषांच्या टोळक्याने पोलिसांवर विटा व लाकडी दांड्यांनी हल्ला केला. पोलिसांना पकडून चावा घेणे, झटापट करणे, शिवीगाळ व धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली.
या प्रकरणी बडोद पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी भुसावळ शहरात फरार झाल्याचे निष्पन्न झाले.

मा.पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. कारवाईदरम्यान पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या घरझडतीत एका घरातील लोखंडी कपाटात प्लॅस्टिक पिशवीत मोठ्या प्रमाणात पिवळ्या धातूच्या (सोन्याच्या) लगडी आढळून आल्या. संशयित महिला मरीयम बी. जाफर अली जाफरी व नाझिया टिपू शेख यांनी दिलेल्या कबुलीनुसार, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील अगरावती शहर व इतर ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून घेतल्यानंतर ते वितळवून विक्री केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणात एकूण 16 ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सुमारे एकूण 16 सोन्याच्या लगडी (अंदाजे लाखो रुपयांची) जप्त केल्या आहेत. याशिवाय आरोपी मजहर अब्बास जाफर इराणी (वय 19, रा. भुसावळ) याच्याकडून गावठी लोखंडी पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून शस्त्र अधिनियमाखाली स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोबींग दरम्यान एकूण 16 मोटरसायकली (किंमत सुमारे 4.80 लाख रुपये) जप्त करण्यात आल्या असून, त्यापैकी एक मोटरसायकल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, अन्नेर आदी विविध पोलीस ठाण्यांतील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. सदर कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या