भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवड्यात एक- दोन तरी प्रकरणे समोर येत असून, यामुळे जिल्ह्यातील प्रशासन व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच भुसावळ शहरातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकार?
एका तक्रारदाराविरोधात गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट निघाले होते. हे वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने थेट जळगाव येथील एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने शिताफीने सापळा रचून भुसावळ शहरातील मामा बियाणी शाळा परिसरात कारवाई केली. या वेळी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
पुढील कारवाई सुरू
या कारवाईनंतर दोन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.