भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरात आज रात्री हिंसाचाराची थरारक घटना घडली. अयान कॉलनी परिसरात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समद इस्माईल कुरेशी (वय ३५) यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात भीषण खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतप्त वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी प्राप्त माहितीनुसार, अयान कॉलनी भागातील जाम मोहल्ला परिसरात अचानक समद इस्माईल कुरेशी यांच्यावर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. तसेच, या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्यास तातडीने भुसावळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल वाघ तपास करत आहेत.
पोलीसांनी घटना स्थळाची सुरक्षितता सुनिश्चित करत घटनास्थळाचे फोटोग्राफीकरण तसेच सखोल पंचनाम्याची कार्यवाही केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लवकरच उघडकीस येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या प्रकरणामुळे भीती व्यक्त केली असून, पोलिसांकडून वेगवान कारवाई करण्याची मागणी केली आहे.