भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या एका तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. ही कारवाई श्रीराम नगर परिसरात करण्यात आली.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभागाचे श्री. केदार बारबोले यांनी अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिराजवळ एक इसम गावठी पिस्टलसह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित संदीप सुनील जाधव (वय 23, रा. कुमावत नगर, पंचवटी, नाशिक) यास ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 20 हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी पिस्टल (मॅगझीनसह) व 1 हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका विजय बळिराम नेरकर हे करत असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

