भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील एका महाविद्यालयात बॅडमिंटन खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींकडे शिट्ट्या वाजवून अयोग्य कमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाब विचारणाऱ्या पिडीत मुलीच्या चुलत भावासह त्याच्या मित्राला महाविद्यालयातील तीन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता घडली.
या घटनेनंतर पिडीत मुलीने तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. फिर्यादीवरून रात्री उशिरा सुमारे ११ वाजता तीन अल्पवयीन मुलांवर जबर मारहाण, शिवीगाळ, विनयभंग आणि धारदार हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीत मुलगी (वय १७) ही बी.कॉम शिक्षण घेत असून, गुरुवारी सकाळी आपल्या मैत्रिणींसोबत महाविद्यालयात बॅडमिंटन खेळत होती. त्याचवेळी महाविद्यालयात शिकणारे तीन अल्पवयीन मुले शिट्ट्या वाजवत अयोग्य कमेंट करू लागले. हा प्रकार पाहून मुलीच्या चुलत भावाने व त्याच्या मित्रांनी त्यांना रोखत विचारले की, “तुझ्या बहिणीला असे कोणी केले तर चालेल का?” या उलट्या प्रश्नाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चिडून शिवीगाळ करत भावावर व त्याच्या मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पिडीत मुलींना अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या अशा धक्कादायक कृत्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

