भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांनी भाजपाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांचा १ हजार ८४७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. रविवारी सकाळी निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून पालिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा झेंडा फडकला आहे.नगराध्यक्ष पदाच्या थेट लढतीत गायत्री भंगाळे यांना ४२ हजार २३४ मते मिळाली, तर भाजपाच्या रजनी सावकारे यांना ४० हजार ३८७ मते प्राप्त झाली.मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत मतांमध्ये चढ-उतार दिसून येत होते. अखेर शेवटच्या फेरीनंतर भंगाळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.
या लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्शिया अन्सारी यांना ८ हजार २५१, काँग्रेसच्या सविता प्रवीण सुरवाडे यांना ४ हजार ०७१, तर बसपाच्या किर्ती सुरेश वानखेडे यांना १ हजार ०९६ मते मिळाली. विशेष म्हणजे १ हजार १४६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडत असंतोष नोंदवला.प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती रंगल्या. भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाने वर्चस्व राखले. प्रभाग १ ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे, तर १ ‘ब’ मधून गिरीश सुरेश महाजन विजयी झाले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भाजपाला प्रत्येकी एक जागा मिळाली, तर प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली.प्रभाग चार, पाच व सहामध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाले असले, तरी काही ठिकाणी मतांचे अंतर अत्यल्प असल्याने या लढती चर्चेचा विषय ठरल्या. प्रभाग सातमध्ये अपक्ष उमेदवार सुजित हेमराज पाटील यांनी भाजपाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. प्रभाग आठमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली. प्रभाग नऊमधील काका-पुतण्या लढत विशेष चर्चेचा विषय ठरली असून भाजपाच्या युवराज लोणारी यांनी जयंत लोणारी यांचा पराभव केला.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान मिडीया कक्षातील गैरव्यवस्थेबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होऊनही दीर्घकाळ अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने तसेच काही माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने पत्रकारांनी मिडीया कक्षाचा बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी व प्रशासनाकडे तक्रार नोंदवली.एकूणच भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा नगराध्यक्ष पदावरील विजय, भाजपाचे प्रभागनिहाय वर्चस्व, विविध पक्षांचे मिश्र यश व माध्यमांशी संबंधित वाद यांमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

