Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ तालुक्यात दुर्दैवी घटना : साक्री येथे शिकवणीला निघालेल्या दोन नववीतील विद्यार्थिनींचे...

भुसावळ तालुक्यात दुर्दैवी घटना : साक्री येथे शिकवणीला निघालेल्या दोन नववीतील विद्यार्थिनींचे मृतदेह…आढळले विहिरीत!

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात सकाळी शिकवणीसाठी घरातून निघालेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. दोन्ही मुली इयत्ता नववीत शिक्षण घेत असल्याची माहिती असून या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.नेहमीप्रमाणे सकाळी शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या दोन्ही मुली बराच वेळ उलटूनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गाव परिसरात शोध घेत असताना गावालगतच्या शेतातील विहिरीजवळ संशय बळावला. विहिरीत पाहणी केल्यानंतर पाण्यात दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. ही माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की अन्य काही कारण, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार भुसावळ पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार मिळताच शोधमोहीम राबविण्यात आली असता साकरी गावाजवळील विहिरीत दोन मृतदेह आढळून आले. सध्या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती देण्यात येईल.
या दुर्दैवी घटनेमुळे साकरी गावासह भुसावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या