बोदवड/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- बोदवड ते शेलवड तसेच तपोवन येथील महालक्ष्मी मंदिराच्या मार्गावर एक इसम तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवत तसेच नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.
जिल्ह्यात मिश्र वस्तीच्या ठिकाणी, तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून शस्त्रे बाळगून वातावरण बिघडवण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की, बोदवड ते शेलवड तसेच तपोवन येथील महालक्ष्मी मंदिराच्या मार्गावर एक इसम तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवत आहे. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. प्रितम पाटील आणि पो.अं. रविंद्र चौधरी यांचे पथक तात्काळ कारवाईसाठी रवाना केले.पथकाने दिलेल्या ठिकाणी पोहचून शोध घेतला असता, माळी वाडा, बोदवड येथील पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय 26) हा इसम तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण ₹4,500/- किंमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 106/2025 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.