एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात केले स्थानबद्ध…!
पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह -: खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड करणे, दंगल माजविणे, हाणामारी करुन दहशत पसरविणे असे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए खाली कारवाई केली आहे. यश विजय चांदणे (वय २२, रा. पठाण चाळ, बोपोडी) असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला बुलडाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
यश चांदणे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड करणे, दंगल माजविणे, हाणामारी करुन दहशत पसरविणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा प्रकारचे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती न थांबल्याने खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्फत एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची छाननी करुन यश चांदणे याला एक वर्ष बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
खडकी पोलिसांनी हा आदेश यश चांदणे याच्यावर बजावून त्याची रवानगी बुलढाणा कारागृहात केली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार बी. डी. शेवरे, पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के, विकास धायतडक, जया थिटे, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.