Wednesday, February 25, 2026
police dakshta logo
Homeजळगावभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जळगाव युनिटमध्ये माथाडी कामगारांवर अन्यायाचा आरोप : २५...

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जळगाव युनिटमध्ये माथाडी कामगारांवर अन्यायाचा आरोप : २५ वर्षे सेवा देणाऱ्या ३० कामगारांवर आर्थिक गदा ; जेवणाची सुट्टी रद्द केल्याची तक्रार

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या जळगाव युनिटमध्ये दीर्घकाळ सेवा देणाऱ्या माथाडी कामगारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. गेली सुमारे २५ वर्षे प्रामाणिकपणे हमालीचे काम करणाऱ्या नशिराबाद येथील सुमारे ३० माथाडी कामगारांवर कंपनी प्रशासनाच्या काही निर्णयांमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदानासाठी कायदेशीर सुट्टी घेतल्याचा ठपका ठेवत संबंधित कामगारांना काही काळ कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला. या निर्णयामुळे त्यांच्या उत्पन्नावर तात्काळ परिणाम झाला. काही दिवसांनंतर कामावर पुन्हा रुजू करून घेतले असले, तरी दरम्यान कंपनीने परप्रांतीय कामगारांची नियुक्ती केल्याने स्थानिक कामगारांच्या कामाच्या वाट्यात घट झाल्याची तक्रार आहे.माथाडी काम हे पूर्णपणे रोजंदारी स्वरूपाचे असून “काम तेवढे पैसे” या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे उपलब्ध काम कमी झाल्याने त्यांच्या दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होत असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे.याशिवाय, वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या या कामगारांची जेवणाची सुट्टीही रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कामाच्या तासांमध्ये वाढ होऊन शारीरिक ताण अधिक वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी संबंधित कामगारांची व्यथा जाणून घेत तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून येत्या २८ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावल्याची माहिती मिळाली आहे.सदर प्रकरणात अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळावा, तसेच त्यांच्या रोजगार आणि हक्कांचे संरक्षण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित बैठकीकडे कामगार व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या