भुसावळ/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढतच असून आता चोरट्यांनी आपले लक्ष बस प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स लुटण्याकडे केंद्रित केले आहे. रविवारी दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजाता भुसावळ बसस्थानक येथून खामगाव येथे प्रवास करत असलेल्या दोन महिलांच्या पर्समधून १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ६ नोव्हेंबर सोमवार रोजी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुनम नितीन कुमार दुबे (वय ३२), रा. मधुनगर आग्रा, उत्तरप्रदेश ही महिला व तिची सहकारी सोनी आशिष मिश्रा ५ नोव्हेंबर रविवारी रोजी भुसावळ बसस्थानक येथे आल्या. दुपारी १ वाजता त्यांना खामगाव येथे जाण्याचे असल्याने भुसावळहून खामगाव असा प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
प्रकार घडल्यानंतर सदर महिलेने दुसऱ्या दिवशी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी करीत आहे.

