चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील कन्नड घाटात महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३९ किलो ‘अँफेटामाईन’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या ड्रग्जचा बाजारभाव अंदाजे ६० कोटी रुपये इतका असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई काल (दि. २५ जुलै) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. धुळेहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या ब्रेझा कारला महामार्ग पोलिसांनी कन्नड घाटात थांबवले. प्राथमिक चौकशीत चालकाकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळले. त्यामुळे कारची सखोल झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान कारच्या मागील बाजूस ठेवलेल्या दोन बॅगांमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय बळावला.
तपासणीदरम्यान या बॅगांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असणारे अँफेटामाईन नावाचे ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ हा संपूर्ण साठा जप्त करत चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी, “या मागे मोठे ड्रग रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून, सखोल चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या मोठ्या ड्रग्ज साठ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्वर रेड्डी यांनी रात्री उशिरा चाळीसगावला भेट देत अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतल्याचे वृत्त आहे.