वृत्तसेवा |नवी दिल्ली |पोलीस दक्षता लाईव्ह :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. आता 2026 पासून 10वीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. यामध्ये पहिली परीक्षा फेब्रुवारीत आणि दुसरी मे महिन्यात होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.
CBSE च्या नव्या नियमानुसार, फेब्रुवारीतील पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. दुसऱ्या परीक्षेला फक्त तेच विद्यार्थी बसू शकतील जे पहिल्या परीक्षेत पास झालेत, किंवा एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेत.दुसऱ्या परीक्षेत जास्तीत जास्त तीन विषयांची निवड करता येणार असून, ती निवड विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि एक भाषा अशा गटातून करावी लागेल. तीन किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र दुसरी संधी दिली जाणार नाही आणि त्यांना पुन्हा वर्ष द्यावे लागेल.
निकाल आणि गुणांची गणना कशी होईल?
CBSE ने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यास, ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील तेच अंतिम गुण मानले जातील. गुणपत्रिकेत देखील फक्त जास्त गुणच दाखवले जातील.
खेळाडूंसाठी विशेष सवलत:
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना, दोन्हीपैकी एक परीक्षा निवडण्याची मुभा दिली जाईल. यासाठी अधिकृत प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
पहिली परीक्षा: 17 फेब्रुवारी 2026
निकाल: 20 एप्रिल 2026
दुसरी परीक्षा: 5 मे 2026
CBSE च्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा तणाव कमी होण्याची आणि गुणवत्तेचा दर्जा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.