एकूण २९ पाणबुडी मोटारी व एक मोटार सायकल हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोटार सायकली तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २९ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी व एक चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात यश मिळवले असून, या चोरीच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे हातगाव येथे दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल चोरून नेली होती. या घटनेवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ३०८/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी…
१) सोमनाथ ऊर्फ लंगडया रघुनाथ निकम, रा. अंधारी ता. चाळीसगाव
२) सुधीर नाना निकम, रा. महारवाडी ता. चाळीसगाव
३) सम्राट रविंद्र बागुल, रा. महारवाडी ता. चाळीसगाव
तपासादरम्यान चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबानुसार चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. पुढील सखोल चौकशीत या आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील हातगाव, अंधारी, रोहीणी तसेच नांदगाव (जि. नाशिक) या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणबुडी मोटारी चोरून त्या स्वतःच्या नावाने विक्री केल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी व एक मोटार सायकल जप्त केली. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळवून पुढील तपास करण्यात आला असता आणखी १८ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करण्यात यश आले. अशा प्रकारे एकूण २९ पाणबुडी मोटारी व एक मोटार सायकल पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत पाटील (चाळीसगाव ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोका महेश पाटील, पोका भुषण शेलार, पोका सागर पाटील, चापोकॉ बाबासाहेब पाटील, तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सफौ. युवराज नाईक, पोहेका गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण व विजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.
पोलीसांचे आवाहन:
चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जर कोणाच्या शेतातील पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या असतील, तर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून ओळख पटवावी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपली मालमत्ता परत घ्यावी.