जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणातील चार महिन्यांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (वय २४, रा. मस्जिद जवळ, शिरसोली प्र.न., ता. जि. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (२७ जुलै) रोजी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून नाट्यमय पद्धतीने अटक केली.
गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.या प्रकरणात यापूर्वीच सागर शिवराम डोईफोडे (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला अटक करण्यात आली होती. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात गुन्ह्यात मुस्तकीम उर्फ जुनेद शाह तसेच रवि प्रकाश चव्हाण व नितीन चव्हाण (दोघेही रा. तांबापुरा, जळगाव) हेही सहभागी असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी त्यानंतर फरार आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, मुस्तकीम हा पोलिसांच्या शोधाला चकवा देत गुजरातमधील सुरत येथे लपून बसला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोहवा अकरम शेख व पोशि रविंद्र कापडणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो २७ जुलै रोजी जळगावात परतणार असल्याचे समजले. तत्काळ सिंधी कॉलनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.
चार गुन्ह्यांची कबुली
पोलिसी चौकशीत आरोपीने केवळ पूर्वीच्या घरफोडीचीच नव्हे तर रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात नवीन गुन्हेही नोंदवले आहेत. आज (२८ जुलै) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मोठ्या पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि स्था. गु. शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पो.उ.नि. शरद बागल, पोहवा अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, पो.ना. किशोर पाटील, पो.शि. रविंद्र कापडणे, चा.पो.शि. महेश सोमवंशी आदींचा समावेश होता.