छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गारखेडा परिसरातील स्वप्ननगरी येथे राहणाऱ्या वकील दाम्पत्याने गंगापूर जहाँगीर येथील प्लॉट्सची एकाच वेळी अनेकांना विक्री करून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुद्रांक नोंदणीच्या विकेंद्रीकरणाच्या सुविधेचा गैरफायदा घेत या दाम्पत्याने तब्बल दोन वर्षांत सातहून अधिक नागरिकांना गंडविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हर्षल भागचंद शिंदे व सायली हर्षल शिंदे असे या वकील दाम्पत्याचे नाव असून, त्यांच्या विरोधात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
प्रभारी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे व जगदीश रोजेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात, तर दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. तक्रारीनुसार गंगापूर जहाँगीर गट क्रमांक १४१ मधील ‘साई निवारा’ येथील ९६९ चौ.फूट क्षेत्रफळाचा प्लॉट क्रमांक १४ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विकण्यात आला. तसेच प्लॉट क्रमांक १५ तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या खरेदीदारांना विकण्यात आला आहे. याशिवाय बनावट मुख्यत्यारपत्र तयार करून दुय्यम निबंधकांचे शिक्के बनविल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रामकृष्ण काळे व शैलेश देशमुख करीत आहेत.
फसवणुकीचे व्यवहार
व्यवहार १ :
दुय्यम निबंधक क्र. ३ जगदीश रोजेकर यांच्या तक्रारीनुसार, शिंदे दाम्पत्याने प्लॉट क्र. १४ दस्त नोंदणी क्र. ११३९१/२०२४ नुसार २ लाख ८७ हजारांत करण गाणार (रा. चिकलठाणा) यांना, तसेच त्याच प्लॉटची पुन्हा २ लाख ९० हजारांत शेखानी हबीब वली मोहम्मद (रा. बीड) यांना विक्री केली.
व्यवहार २ :
दुय्यम निबंधक क्र. ६ औदुंबर लाटे यांच्या तक्रारीनुसार, प्लॉट क्र. १५ दस्त नोंदणी क्र. ५६१८/२०२५ नुसार ३ लाख ५० हजारांत स्वप्नाली पांडव (रा. नारळीबाग) यांना विकला.
व्यवहार ३ :
त्याच प्लॉटची दस्त नोंदणी क्र. ६८६८/२०२५ नुसार ६ लाख ३० हजारांत संतोष सुकाशे (रा. घोडेगाव) यांना विक्री केली.
व्यवहार ४ :
प्लॉट क्र. १५ दस्त नोंदणी क्र. १२०९३/२०२५ नुसार ६ लाख ५० हजारांत शे. जुबेर शे. अब्दुल अजीज (रा. सिल्क मिल कॉलनी) यांना विकण्यात आला.
व्यवहार ५ :
दस्त नोंदणी क्र. १०५१३/२०२५ नुसार दादासाहेब ठेंगल व इतर (रा. बीड) यांना बनावट मुखत्यारनामा तयार करून गट नं. १४१ मधील प्लॉट क्र. सी-३३ कल्पना महाले (रा. सिडको महानगर १) यांच्या नावे विक्री करण्यात आली.
व्यवहार ६ :
दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ६ मध्ये दस्त नोंदणी क्र. १०८३६/२०२५ नुसार, कार्यालय क्र. ५ मधील दस्त क्र. ४३४६/२०२४ नोंदणीकृत असल्याचे भासवून बनावट शिक्के व कागदपत्रांच्या आधारे प्लॉट क्र. सी-३३ चे खोटे मुख्यत्यारपत्र तयार करण्यात आले.
कामकाजावर परिणाम
बायपासवरील दोन्ही मुद्रांक नोंदणी कार्यालयांतील दुय्यम निबंधकांना पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी जावे लागल्याने कार्यालयीन कामकाजही ठप्प झाले आहे. एकाच प्लॉटची अनेकांना विक्री, बनावट शिक्के व दस्तावेज तयार करण्याचा हा प्रकार शहरात खळबळ उडविणारा ठरला असून, पोलिसांकडून आरोपी वकील दाम्पत्याचा कसून तपास सुरू आहे.

