Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप

नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप

चिनावल  | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने, पर्यावरणपूरक पद्धतीने व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून उत्सवाचा थाटात व उत्साही समारोप करण्यात आला.

यावर्षी शाळेत साकारण्यात आलेली शाडू मातीपासूनची गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनीच शाळेत तयार केली होती, व ती नैसर्गिक रंगांनी रंगवण्यात आली होती. मूर्तीच्या सजावटीसाठी आणि देखाव्यासाठीही पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करण्यात आला, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण झाली. गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत विद्यार्थ्यांसाठी श्लोक पठण, भजन, नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला, निबंध लेखन यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामुळे गणेशोत्सव आनंददायी, शैक्षणिक आणि संस्कारक्षम झाला.

मिरवणुकीचा उत्साही जल्लोष

विसर्जनाच्या दिवशी, गणेशमूर्तीची साध्या व पारंपरिक पद्धतीने सजवलेली पालखी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती विराजमान करून संपूर्ण शाळेच्या परिसरात लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी होत संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून टाकले. या आकर्षक आणि उत्साहवर्धक मिरवणुकीने परिसर दुमदुमून गेला, आणि शाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. मिरवणुकीनंतर मूर्तीचे विसर्जन शाळेच्या परिसरातच साकारलेल्या कृत्रिम जलकुंडात करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊ व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.

या पारंपरिक पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव समारोपाला प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमाला सुनील भास्कर महाजन अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ चिनावल, राजेंद्र वामन फालक उपाध्यक्ष, गोपाळ देवचंद पाटील सचिव, खेमचंद्र गोवर्धन पाटील चेअरमन, दामोदर यादव महाजन संचालक, किशोर भिवसन बोरोले संचालक, राजेंद्र मुरलीधर पाटील संचालक, सुरेश गिरधर गारसे  संचालक, दामोदर गणपत भंगाळे संचालक, निळकंठ भोजराज चौधरी संचालक, अनिल सुधाकर किरण संचालक, विनायक कमलाकर महाजन संचालक, मनोहर विठ्ठल पाटील शालेय समिती सदस्य, रामदास नेमाडे ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी संपूर्ण गणेशोत्सवाचे आयोजन शिस्तबद्ध, उत्साही व प्रेरणादायी पद्धतीने पार पाडले.

या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, सांस्कृतिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता या मूल्यांची जाणीव निर्माण झाली. शाळेने सादर केलेला आदर्श, पर्यावरणपूरक आणि अनुकरणीय गणेशोत्सव संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या