चिनावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरण पूरक शाडू मातीपासून श्री गणेशाची मूर्ती घडविण्याची कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या मूर्ती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला. सदर कार्यशाळेसाठी श्री ललित भोरटक्के सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मातीशी संवाद साधताना कलात्मकतेसोबत पर्यावरणपूरकतेचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान श्री खेमचंद्र गोवर्धन पाटील (चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल), तसेच मुख्याध्यापक श्री गणेश सुभाष बाविस्कर यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.
मुख्याध्यापक श्री बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “आपण सर्वांनी पर्यावरणाविषयी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाणी व निसर्गाला हानी पोहोचते, तर शाडू मातीच्या मूर्ती या निसर्गाशी सुसंगत असून त्यांचा पाण्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. भावी पिढ्यांसाठी शुद्ध पाणी, स्वच्छ निसर्ग राखायचा असेल तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव अपरिहार्य आहे,” असे मार्गदर्शन केले.
यावेळी उपशिक्षक श्रीमती हर्षाली कोल्हे, श्रीमती भावना नेमाडे, श्रीमती विनिता नारखेडे, श्रीमती सपना टोके, श्री मिलिंद गारसे, श्रीमती कविता नेमाडे, श्रीमती कविता पाटील, श्रीमती श्रद्धा नेमाडे, श्री संतोष काळे तसेच शिपाई श्री चंद्रकांत कुरकुरे यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यशाळा यशस्वी केली.
शाडू मातीचे महत्त्व :
आजच्या प्रदूषणाच्या युगात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नद्या, तलाव, विहिरी दूषित होत आहेत, जलचर जीव धोक्यात येत आहेत. अशा वेळी शाडू मातीपासून घडविलेल्या गणेशमूर्ती हे पर्यावरणास अपायकारक नसून पूर्णतः निसर्गाशी सुसंगत आहेत. विसर्जनानंतर ही माती सहज पाण्यात विरघळते, त्यामुळे पाणी व पर्यावरण दूषित होत नाही. मातीचे पुनर्वापर, जलस्रोतांचे संरक्षण व हरित संदेश यांचा संगम शाडू मातीच्या मूर्तींत आहे.
गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा :
या कार्यशाळेचा एक विशेष उपक्रम म्हणून गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यातून लकीत अमित तडवी (इयत्ता तिसरी, सेमी), पियुष बाळू पवार (इयत्ता तिसरी, मराठी माध्यम) व उत्कर्ष जितेंद्र नेमाडे (इयत्ता दुसरी, सेमी) या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून बाजी मारली. या तिघा विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र माननीय चेअरमन श्री.खेमचंद्र गोवर्धन पाटील (शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल) यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी घडविलेल्या मूर्तींकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कुतूहल व समाधान हा अनमोल क्षण ठरला. निसर्गप्रेमी व सामाजिक बांधिलकी जपणारी अशी कार्यशाळा ही नूतन प्राथमिक विद्यामंदिराची अनोखी परंपरा ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.