चिनावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिनावल येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे भव्य शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात शिवभक्तीचा जयघोष घुमला आणि विद्यार्थ्यांनी इतिहास साकारला.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे तसेच इतर मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून भव्य रॅली काढली. “जय भवानी, जय शिवाजी!” या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमले. रॅली गावातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात पार पडली.विद्यार्थ्यांनी नृत्य, पोवाडे आणि प्रभावी भाषणांद्वारे उपस्थितांना भारावून टाकले. बसस्थानक व ग्रामपंचायत चिनावल परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी बक्षिसांची उधळण करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र वामन फालक, चेअरमन खेमचंद गोवर्धन पाटील, सेक्रेटरी गोपाळ पाटील यांच्यासह दामोदर महाजन, किशोर बोरोले, राजेंद्र पाटील, सुरेश (बन्सी) गारसे, निळकंठ चौधरी, अनिल किरंगे, विनायक महाजन, मनोहर पाटील तसेच मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली. ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव व संजय मधुकर भालेराव यांनी मूर्तीपूजन केले. ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी शिवजयंतीचे महत्त्व विशद केले. ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणासाठी २१११ रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन महाजन, हर्षाली कोल्हे, मिलिंद गारसे, भावना नेमाडे, सपना टोके, कविता नेमाडे, कविता पाटील, विनिता नारखेडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत कुरकुरे व महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या भव्य आयोजनामुळे ग्रामस्थांनी शाळेच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा केली असून शिक्षकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे

