जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मानवी संवेदना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चोपड्याच्या सातपुड्यातील जिरायतपाडा गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधम तरुणाने पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना मंगळवारच्या मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. घरातील सर्वजण झोपलेले असताना पीडित मुलगी लघुशंकेसाठी बाहेर अंगणात गेली होती. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या स्नेहल दिलीप पावरा या तरुणाने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने तिला जवळच्याच एका बंद घरात नेले आणि तेथे तब्बल पाच तास तिला डांबून ठेवत पाशवी अत्याचार केला.
मुलगी घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी संपूर्ण गावात रात्रीभर शोधाशोध केली. अखेर पहाटे चारच्या सुमारास ती रडत, थरथरत घरी परतली. घरच्यांनी विचारणा केली असता, तिने घडलेली आपबिती सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिचे तोंड व हात घट्ट बांधले आणि अंधाराचा फायदा घेत बंद घरात घेऊन गेला. त्यानंतर सकाळी तोच नराधम तिला घरी सोडून गेला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी स्नेहल दिलीप पावरा याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप व ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव नितनवरे हे पुढील तपास करत आहेत.