जळगाव |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चोपडा तालुक्यातील लोणी गावात गुरुवार, दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गोवंश कत्तलीच्या संशयित प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादातून दोन गोरक्षकांवर स्थानिक कसाई समुदायातील काही व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली आहे.जखमींमध्ये कृष्णा भिल (वय १८, रा. जामनेर) आणि योगेश महाराज कोळी (वय ३५, रा. जळगाव) यांचा समावेश असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातून समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा भिल याला लोणी गावात गोवंश कत्तल सुरू असल्याचे कळताच तो, योगेश कोळी आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी गेले. त्यांनी कत्तल करण्यास विरोध केल्यावर आरोपीनं शिवीगाळ करत मारहाण केली. याच दरम्यान काही लोकांनी चॉपर, कोयते आणि लोखंडी दांड्यांसह हल्ला चढवला. हल्ल्यात योगेश कोळी यांच्या मांडीवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आला, तर कृष्णा भिललाही जोरदार मारहाण झाली.हल्ल्यानंतर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी आणलेल्या दोघांच्या नातेवाईकांसह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालय परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
या घटनेमुळे लोणी परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास चोपडा पोलिसांकडून सुरू आहे.

