पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपी अटकेत
चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चोपडा तालुक्यातील उमर्टी गावाजवळ सत्रासेन नाक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत ०४ गावठी कट्टे (अग्निशस्त्र) आणि ८ जिवंत काडतुसे जप्त केली असून पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने राज्यात अवैध शस्त्र वाहतुकीच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पारउमटी – अवैध शस्त्रांचा अड्डा
मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पारउमटी हे गाव महाराष्ट्राच्या सीमेलगत असून येथील शिकलकर समाजातील काही लोकांकडून अवैध शस्त्रांचे उत्पादन व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून चोपडा उपविभागात विशेष नाकाबंदी करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान संशयित पकडले
दि. २३ जुलै २०२५ रोजी सत्रासेन नाक्यावर नाकाबंदी करत असताना पोलिसांना एक मोटरसायकल वेगात येताना दिसली. पोलिसांनी वॉरीकेट्स लावल्यावर चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचारी रावसाहेब पाटील यांनी तत्परतेने पकडले. गाडीवर असलेल्या दोन व्यक्तींची तपासणी केल्यावर त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे मिळून आली.
या कारवाई दरम्यान मंथन मोहन गायकवाड (२२), रा. वडाळा, ता. वाशी, जि. सोलापूर, सध्या राहणार हडपसर, (पुणे), स्वप्नील विभीषण कोकाटे (३२), रा. रुई, ता. वाशी, जि. धाराशिव यांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान त्यांनी आपल्या इतर साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. आप्पासाहेब गायकवाड व कानीफनाथ वहीरट या दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. हे आरोपी धुळे येथे थांबले होते व अटक आरोपींनी शस्त्रांची वाहतूक करण्याची जबाबदारी घेतली होती.
शस्त्र कुठून आणली?
अटक आरोपींनी उमर्टी येथील शिकलकर टोपी उर्फ पाजी याच्याकडून ५०,००० रुपयांना ही शस्त्रे खरेदी केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी मंधन गायकवाड याच्यावर पूर्वीही शस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. ही शस्त्रे कुणाला विकली जाणार होती याचा शोध सुरू आहे.
पोलीस तपास सुरू
संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वापु सांळुंके, पो.कॉ. चेतन महाजन, विशाल पाटील व इतर पथकांनी केली. पुढील तपास सुरू असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.