जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा बसावा व तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी ८ किलो १३० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली असून, २.६५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २० जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली. पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन इसम काळ्या रंगाच्या बजाज पल्सर (MH-RCBW-8035) मोटारसायकलवरून गांजा वाहून नेत असल्याची माहिती मिळाली होती.यावरून पोलिसांनी गानंगी गावाजवळ पाळत ठेवताच, संबंधित इसम भरधाव वेगात चोपडा शहराकडे निघाले. पोलिसांनी पाठलाग करून चोपडा शहरात नाकाबंदी केली. यावेळी मोटरसायकलवर मागे बसलेला इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, पोउपनिरीक्षक जितेंद्र अल्टे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.या कारवाईत एक बजाज पल्सर मोटारसायकल (किंमत ₹९०,०००), ८ किलो १३० ग्रॅम गांजा (किंमत ₹१,२९,१५०), दोन मोबाईल फोन (किंमत ₹५१,०००) असा एकूण ₹२,६५,१५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव), आशासाहेब घोलप (उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), मधुकर माळवे (पोलीस निरीक्षक), एकनाथ निसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), पो.ना. विष्णू बिन्हाडे, रविंद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, दीपक चौधरी (चालक) व चोपडा शहर पोलीस ठाण्यातील पो.कॉ. मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे यांच्या पथकाने केली.