नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिरसाळा येथील मारुती मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणाचा नशिराबाद पुलाजवळ अपघातात मृत्यू झाला. भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील हर्षल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र कुणाल गोकुळ पाटील गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल आणि त्याचे मित्र शिरसाळा मारुती मंदिराच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाले होते. नशिराबाद गावाजवळील टोल नाक्याजवळील पुलावरून जात असताना भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हर्षल पाटील हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.