जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहून नेणाऱ्या बल्कर वाहनांमुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महामार्गावर बल्कर उभी करू नयेत, असे स्पष्ट निर्देश वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री सावकारे होते. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे अधिकारी व औष्णिक प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीत बल्कर वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी, संभाव्य अपघात व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून खालील उपाययोजना निश्चित करण्यात आल्या:
सर्व्हिस रोडवर बल्कर उभे करण्यास बंदी
राख वाहतुकीसाठी नियोजित वेळापत्रक तयार करणे
वाहतूक पोलिस व प्रकल्प सुरक्षा यांच्यात समन्वय
रस्त्यावर CCTV, संकेतचिन्हे व सुरक्षारक्षकांची नेमणूक
मंत्री सावकारे यांनी यावेळी सांगितले की, “रस्ता सुरक्षा आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे सर्व विभागांचे प्राधान्य असले पाहिजे. नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सर्व संबंधितांनी तातडीने पावले उचलावीत.”