जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी शिरसोली रस्त्यावरील देवकर कॉलेज परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज परिसर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती देवकर कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. रविवारी दुपारी कपडे धुतल्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच ती होस्टलच्या खोलीत आली असता तिला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. सोबत असलेल्या मैत्रिणींनी तातडीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या अनपेक्षित घटनेमुळे देवकर कॉलेज परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

