फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- १२ ऑगस्ट हा रॅगिंग विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १२ ते १८ ऑगस्ट हा रॅगिंग विरोधी आठवडा म्हणून जाहीर करण्यात आला होता. या उपक्रमाच्या अनुषंगाने यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात रॅगिंग विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. एस. जगताप यांनी केले. रॅगिंग या विकृत प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, हिनभावना, नैराश्य निर्माण होऊन गंभीर प्रसंगी आत्महत्येपर्यंत प्रवृत्ती जाते, याबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. महाविद्यालये ही सुसंस्कार घडवण्याची केंद्रे असून रॅगिंगमुळे शैक्षणिक नुकसानासह मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो, यावर विशेष भर देण्यात आला.शिबिराचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. हरीश नेमाडे यांनी भूषविले. सूत्रसंचालन डॉ. ताराचंद सावसाखळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.