धरणगाव पोलिसांची अवघ्या चार तासांत मोठी कारवाई ; ९ जणांच्या टोळीचा उलगडा
धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहर व परिसरात वीज तारा चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. अवघ्या चार तासांत पाठलाग करत आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे चोरीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला आहे.धरणगाव पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वीज तारा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक तयार करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांच्या पथकाने सापळा रचला.१५ फेब्रुवारी रोजी आरोपींचा पाठलाग करून अजय बापू गायकवाड याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून चौकशीदरम्यान या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांसह एकूण ९ जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले.पोलिसांनी इलेक्ट्रिक पोलवरून चोरी केलेली सुमारे ४.५० लाख रुपये किमतीची वीज तार तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप (एमएच ०४ जीएफ ४८७२) किंमत सुमारे ६ लाख रुपये असा एकूण १०.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चौकशीदरम्यान आरोपींनी केवळ धरणगावच नव्हे तर चोपडा व अडावद परिसरातही वीज तारा चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या भागातील इतर चोरी प्रकरणे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ही कारवाई महेश्वर रेड्डी, कविता नेरकर, आनंदराव घोलप व सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत हेड कॉन्स्टेबल व पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

