धर्माबाद | ता. प्रतिनिधी गंगाधर हणमंते | पोलीस दक्षता लाईव्ह :- धर्माबाद शहरातील पाणीपुरवठ्याची जुनी पाईपलाईन सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली असल्याने ती पूर्णतः जीर्ण झाली होती. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होत असून पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत होते. याचा मोठा आर्थिक फटका विशेषतः गोरगरीब जनतेला बसत होता.ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धर्माबाद शहरासाठी शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने तब्बल ७१ कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या कामाचा शुभारंभ अंगारकी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. संगीताताई शंकर बोल्लमवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या योजनेचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष स्व. विनायकराव कुलकर्णी यांनी सन २०१५ पासून सुरू केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मात्र पुढील काळात नगरसेवकांतील अंतर्गत मतभेदांमुळे शहराच्या विकासाला काहीसा खीळ बसली. तरीदेखील तत्कालीन मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता व कर्मचाऱ्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. यासोबतच दै. पुण्यनगरीने वेळोवेळी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आमदार राजेश पवार यांच्या सहकार्यामुळे अखेर ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर होऊ शकली.मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर अण्णा बोल्लमवाड यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पाणीटंचाईग्रस्त भागातूनच कामाची सुरुवात करण्याचे आश्वासन दिले होते. शहरातील जनतेने मराठवाडा जनहित पार्टीवर विश्वास टाकल्यामुळे आज या ७१ कोटी रुपयांच्या योजनेच्या कामाचा शुभारंभ रामनगर परिसरातून करण्यात आला असून परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या योजनेअंतर्गत अंदाजे दीड वर्षांत काम पूर्ण करणे बंधनकारक असून प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शहरातील गल्लीबोळांतून सुमारे ९५ किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. धर्माबाद शहराच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात निधी यापूर्वी कधीही उपलब्ध झाला नव्हता. शुभारंभप्रसंगी नगराध्यक्षा सौ. संगीताताई शंकर बोल्लमवाड यांनी सांगितले की, या ऐतिहासिक निधीचा योग्य व पारदर्शक वापर करून दर्जेदार काम करण्यात येईल. पुढील ५० वर्षे या पाईपलाईनला कोणताही धोका निर्माण होणार नाही, त्यामुळे दीड वर्षांनंतर शहरवासीयांना कायमस्वरूपी शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर अण्णा बोल्लमवाड, नगराध्यक्षा सौ. संगीताताई बोल्लमववाड, गटनेते ताहेर पठाण, माजी उपनगराध्यक्ष देविदास बिपटवार, नगरसेवक कृष्णा तिम्मापुरे, समीर भाई, इज्जू भाई, अलीमोद्दीन चौधरी, सतीश उशलवार, सुदर्शन गुर्जेलवाड, सुलताना बेगम, सौ. सुरकूटवार, सौ. शोभा आईटवार, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी किशनराव सोनकांबळे, गंगाधर सूर्यवंशी तसेच मराठवाडा जनहित पार्टीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

