सावदा /प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या एक महिन्यांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात दिवाळीचा उत्साह सुरु होता. अनेक मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे दिवाळीसाठी आलेले आता पुन्हा शहराकडे जात असल्याने रेल्वेस्थानकासह बस स्थानक व खाजगी बसेसमध्ये मोठी गर्दी होवू लागली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस हाऊस फुल्ल आहेत.असे असतांना खाजगी ट्रॅव्हल्स ची मनमानी सुरू असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत.
रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली.ही घटना घडत असताना प्रवासी घाबरले.सुदैवाने त्यातील २० प्रवासी सुरक्षित राहिले. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना रावेर-सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या तर व काही जणांनी आपल्याकडील सामान फेकून दिले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी डिकीतील प्रवाशांचा सामान जळून खाक झाला.
रावेर पुणे ही लक्झरी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवासी घेऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रावेर येथून निघाली. दरम्यान, ही बस वडगाव ते वाघोदादरम्यानच्या सुकी नदीच्या पुलाजवळून जात असताना बसचे मागील टायर फुटले आणि बसने अचानक पेट घेतला.आगीचा प्रकार लक्षात येताच चालकाने बस बाजूला थांबवून वाहकाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी खिडक्या आणि संकटकालीन मार्गातून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रस्त्यावरील काही वाहनचालकांनी मदतीचा हात दिला. सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. ब्रेकचे लायनर जाम होऊन अकस्मात आग लागल्याची माहिती मिळाली आहे.