Sunday, March 29, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणधरणगाव: झुरखेडा सरपंचांचा थेट इशारा : १४ एप्रिलपासून शेतात आमरण उपोषण

धरणगाव: झुरखेडा सरपंचांचा थेट इशारा : १४ एप्रिलपासून शेतात आमरण उपोषण

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी न झाल्याचा निषेध; १० कोटींच्या कथित गैरव्यवहारावर कारवाईची मागणी

धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील धरणाव तालुक्यातील झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच तथा शेतकरी नेते सुरेशआप्पा गोविंद पाटील यांनी शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ दि. १४ एप्रिल २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे उपोषण झुरखेडा शिवारातील त्यांच्या गट क्रमांक ७६/३ या शेतात करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना–२०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर दि. १ ऑगस्ट २०१७ पासून लाभ मिळेपर्यंत कोणतेही व्याज आकारू नये, असे शासनाने १३ मार्च २०१८ रोजी स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या आदेशाचे पालन न करता शेतकऱ्यांकडून व्याज आकारणी सुरूच असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून अनेकांना कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रकरणी २०१९ पासून विविध स्तरावर पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विभागीय व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांपासून मंत्रालयापर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबतही माहिती मागविण्यात आली होती. तरीही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने शेती व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातही अद्याप कारवाई न झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. संबंधित व्यवहारांमध्ये नियमभंग, ठरावातील फेरफार व आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. लेखापरीक्षण अहवालात हरकती नोंदवूनही रक्कम वसूल करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

“प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. आता प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही,” असा ठाम इशारा पाटील यांनी दिला.
या घोषणेमुळे झुरखेडा परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. येत्या काही दिवसांत शासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या