धुळे | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- धुळे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केली होती. या मागणीला कृषिमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करून धुळ्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय धुळे शहरात कार्यरत आहे. हे महाविद्यालय धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांसाठी कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवीत असते, या महाविद्यालयांत बी.एस्सी. (कृषी) आणि एम.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रम चालविले जातात. राहुरी कृषी विद्यापीठाचा कार्यक्षेत्र फार मोठे असल्याने सर्व जिल्ह्यांवर प्रभावी देखरेख ठेवणे आणि कारभार सुरळीत चालवणे कुलगुरूंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे धुळे येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास प्रशासनिक सुलभता तर मिळेलच, शिवाय कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यक्रमांनाही अधिक गती मिळेल.लवकरच विद्यापीठ कार्यान्वित होईल असे चित्र दिसत आहे.