विकासकामांना गती देण्याचे आदेश
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धुळे महानगरपालिकेच्या विविध नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस धुळेचे आमदार अनुप अग्रवाल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
धुळे शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या असून, विशेषतः देवपूर, वलवाडी व सखल भागात तातडीने सांडपाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, तापी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुकवद ते बाभळे, बाभळे – धुळे – मालेगाव रोड व दगडी टाकी या भागातील जुन्या जलवाहिन्यांच्या त्वरित दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले. या पाणी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक निधी व मनुष्यबळ पुरवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेली इतर विकासकामेही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत, नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात यावर भर देण्यात आला.