जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती, याची कबुली दिली आहे. मात्र, सध्या पक्षात प्रवेश करणाऱ्या काही व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
खडसे म्हणाले, “माझी भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. पण बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत काम करण्याची इच्छा नाही.” त्यांनी असा दावा केला की भाजपने काही अशा व्यक्तींना पक्षात घेतले आहे, जे पूर्वी गंभीर गुन्ह्यांशी संबंधित होते.या विधानाच्या पार्श्वभूमीवर, खडसेंनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचा संदर्भ देत, त्यांनी अप्रत्यक्षपणे सुधाकर बडगुजर यांचा उल्लेख केला आणि त्यांच्या प्रवेशावर टीका केली.
खडसेंनी असंही सांगितलं की, “मी 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं आहे. आणीबाणीचा काळ अनुभवला आहे. संघाचा स्वयंसेवक म्हणून माझा जुना संबंध आहे.” त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी कोणत्या पक्षात राहावे असे आदेश दिले नाहीत, तर फक्त हिंदुत्वाचे तत्त्व जपावे असे शिकवले आहे.भाजपमध्ये होऊ शकलेला प्रवेश अडवल्याबद्दल काही नेत्यांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत, खडसे यांनी पक्षातील सध्याच्या नेतृत्वाच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केला.