जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एक विशेष प्रकारची पोस्ट अनेकांच्या वॉलवर दिसत आहे. यात वापरकर्ते जाहीरपणे लिहित आहेत की ते फेसबुकला त्यांच्या वैयक्तिक फोटो किंवा माहिती वापरण्याची परवानगी देत नाहीत. या पोस्टमध्ये पुढे असे लिहिलेले असते की “गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतो” आणि इतर मित्रांनीही ही पोस्ट कॉपी-पेस्ट करून टाकावी, असे आवाहन केले जाते. पोस्टचा उद्देश असा दाखवला जातो की यामुळे फेसबुकला तुमचा डेटा वापरण्याचा अधिकार मिळणार नाही. पण वास्तवात या पोस्टमुळे तुमच्या प्रायव्हसीमध्ये काहीही फरक पडत नाही.
Fact Check : दावा खोटा
सायबर तज्ज्ञ आणि फॅक्ट चेकिंग संस्थांच्या मते, ही पोस्ट पूर्णपणे चुकीची आहे. फेसबुकवर अकाउंट तयार करताना तुम्ही त्याच्या Terms & Conditions आणि Privacy Policy स्वीकारता. यात फेसबुक कोणता डेटा गोळा करेल आणि कसा वापरेल हे स्पष्ट लिहिलेले असते. ही धोरणे तुम्ही कॉपी-पेस्ट करून बदलू शकत नाही. तुमच्या डेटा वापरावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य प्रकारे वापरणे.
फेसबुक कोणता डेटा गोळा करते?
ओळख संबंधित माहिती – नाव, जन्मतारीख, लिंग, प्रोफाइल फोटो, ई-मेल, फोन नंबर.
सोशल अॅक्टिव्हिटी – तुम्ही कोणते ग्रुप्स जॉईन केले, कोणते पोस्ट्स आवडले, कोणत्या पेजेसला फॉलो करता.
तांत्रिक माहिती – डिव्हाइस मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टिम, बॅटरी लेव्हल, नेटवर्क तपशील, लोकेशन.
कॉन्टॅक्ट डेटा – तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह केलेल्या संपर्कांची माहिती (जर तुम्ही परवानगी दिली असेल तर).
ही पोस्ट धोकादायक का ठरू शकते?
सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात की अशा पोस्ट्स केवळ निरुपयोगी नसून, कधी कधी धोकादायकही ठरतात. कारण:
हॅकर्सना कळते की कोणत्या वापरकर्त्यांना फॅक्ट चेक न करता माहितीवर विश्वास ठेवण्याची सवय आहे.
अशा लोकांना फसवणूक, फिशिंग किंवा बनावट लिंक्सद्वारे टार्गेट करणे सोपे होते.
तुम्ही स्वतःच सार्वजनिकपणे दाखवत आहात की तुम्हाला प्रायव्हसी धोरणांविषयी पूर्ण माहिती नाही.
प्रायव्हसी जपण्यासाठी उपयुक्त उपाय
प्रायव्हसी सेटिंग्ज अपडेट करा – तुमचे पोस्ट, फोटो आणि प्रोफाइल कोण पाहू शकतो हे ठरवा.
Off-Facebook Activity बंद करा – यामुळे बाहेरील वेबसाइट्सकडून गोळा होणारा डेटा थांबवता येतो.
थर्ड-पार्टी ॲप्स तपासा – जे ॲप्स गरजेचे नाहीत ते हटवा.
Ad Preferences नियंत्रित करा – जाहिरातींसाठी वापरला जाणारा डेटा कमी करा.
संवेदनशील माहिती पोस्ट करू नका – लोकेशन, वैयक्तिक पत्ता, आर्थिक माहिती इ. टाळा.
पूर्ण गोपनीयता हवी असल्यास – फेसबुक अकाउंट डिलीट करण्याचा विचार करा. मात्र, काही डेटा फेसबुककडे राहू शकतो.
Facebook Viral Post Fact Check : 2023 मध्येही अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल
फेसेबुकवर व्हायरल होणारी ही पोस्ट काही नवी नाही. 2023 मध्येही अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल झाली होती. फेसबुक तुमचे फोटो आणि इतर माहिती वापरणार अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत होता. त्यावर Newschecker ने फॅक्ट चेक केलं होतं आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं.
निष्कर्ष
फेसबुकवरील व्हायरल होणारा प्रायव्हसी पोस्ट हा केवळ अफवा आहे. अशी कॉपी-पेस्ट स्टेटमेंट्स तुमचा डेटा वाचवत नाहीत. तुमची खरी सुरक्षा फक्त सेटिंग्जमधून नियंत्रण ठेवणे, अचूक माहिती घेणे आणि अफवांवर विश्वास न ठेवणे होय.

