Sunday, February 22, 2026
police dakshta logo
Homeशैक्षणिकफैजपूर येथील जे.टी.एम. विद्यालयात ‘पॉक्सो’ कायद्यावर मार्गदर्शन शिबीर

फैजपूर येथील जे.टी.एम. विद्यालयात ‘पॉक्सो’ कायद्यावर मार्गदर्शन शिबीर

९० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींचा सहभाग ; विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन!

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– तालुका विधी सेवा समिती, यावल यांच्या वतीने फैजपूर येथील जे.टी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ (पॉक्सो)’ अंतर्गत विद्यार्थी प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री. शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातील कायदेशीर तरतुदी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची सविस्तर माहिती दिली. “बाल लैंगिक अत्याचाराच्या ९० टक्क्यांहून अधिक घटनांमध्ये जवळच्या अथवा ओळखीच्या व्यक्तींचा सहभाग आढळून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क व जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता चुकीच्या गोष्टींना ठामपणे ‘नाही’ म्हणण्याची हिंमत बाळगली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.वारूळकर यांनी ‘गुड टच’ (चांगला स्पर्श) आणि ‘बॅड टच’ (वाईट स्पर्श) यातील फरक सोप्या भाषेत समजावून सांगत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. एखादी संशयास्पद घटना घडत असल्याचे जाणवल्यास तात्काळ त्या ठिकाणाहून दूर जावे व संबंधित प्रकाराची माहिती शिक्षक किंवा पालकांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोजेस जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या पर्यवेक्षिका पूनम नेहते यांनी केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर बाबींबाबत लक्षणीय जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या