फैजपूर | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील आमोदा गावाजवळ रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून भुसावळकडे येणारी लक्झरी बस मोर नदीवरील पुलावरून खाली नदीपात्रात कोसळली. या अपघातात सुमारे २५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एमपी-०९-९००९ क्रमांकाची बस इंदूरवरून भुसावळच्या दिशेने येत होती. पहाटे सुमारे सहा वाजता आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीपात्रात कोसळली. भीषण आवाज झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलाच्या धोकादायक अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे व अन्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.